मांजरी बुद्रुक नागरिकांची पाण्यासाठी वणवण   

कोट्यवधी वाया

खराडी : लोकसंख्येच्या आधारावर सात वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ४३ कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम  सुरू करण्यात आले. मात्र भविष्यातील वाढत्या नागरीकरणाचा वेध घेऊन प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही पुढील २५ वर्षांचे नियोजन न केल्याने अजूनही मांजरी बुद्रुक मधील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.या प्रकल्पाअंतर्गत मांजरी बुद्रुकमध्ये ठिकठिकाणी टाक्यांची उभारणी करण्यात आली. मात्र सध्या टाक्या उशाला, पण कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.
 
या प्रकल्पांतर्गत मुख्य रस्ता तसेच अंतर्गत भागामध्ये जलवाहिन्या टाकण्यात आल्या. त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून जोड कामही सदोष पद्धतीने झाले आहे. तर काही ठिकाणी पाईपलाईन मध्येच कचरा साठलेला आहे. प्रत्यक्ष काम सुरू असताना प्रशासनाचे यावर कुठल्या प्रकारचे नियंत्रण नव्हते. या कामाचा संरचना लेखाजोखा करण्यात आला नाही. 
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी अत्यंत युद्ध पातळीवर  ठिकठिकाणी कुठलीही नियमावली निश्चित न करता खाजगी ठेकेदारांना अप्रत्यक्षपणे नेमून नळ जोडण्या करण्यासाठी नागरिकांच्या कडून पंधराशे ते सोळाशे रुपये घेण्यात आले. परंतु सर्वसामान्य नागरिकांना अर्धा  तर इतरांना मात्र पाऊण ते एक इंचापर्यंतच्या जोडण्या कुणाच्या दबावाखाली देण्यात आल्या आहे. याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. मांजरी बुद्रुक येथील पाणी योजनेचा शाश्वत कृती आराखडा, पुनर्नियोजन व निधी मंजूर करून पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रवीण रणदिवे यांनी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या  येत्या आठ दिवसात लेखी आश्वासन न मिळाल्यास मांजरी ग्रामस्थांच्यासह तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
 
यावेळी सुरज घुले, गणेश घुले, राहुल खलसे, संजय गायकवाड, गणेश मरळ, संतोष ढोरे, गोरख आडेकर, दीपक राखपसरे, आबा मोहिते तसेच सिद्धेश्वर जाधव आदी उपस्थित होते.
 
भूजल पातळी खालावल्याने बोअरवेल मधूनही पुरेसे पाणी येत नाही. त्यातच उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने टँकरच्या माध्यमातून नागरिक आपली तहान भागवत आहेत.  रेल्वे गेट, मांजरी-मुंढवा रस्ता  आणि या दोन्ही भागामधील परिसरात पाणीपुरवठा कधी सुरू होणार.
 
- छाया बनसोडे, रेल्वेगेट  मांजरी बुद्रुक 

Related Articles